यंदा ठाण्यात दहीहंडीचा ‘संघर्ष’ नाही ! कारण…

दहीहंडी आणि ठाणे यांचे खास नाते आहे. लॉकडाऊनमुळे दोन वर्षे दहीहंडी साजरी करता आली नाही मात्र यंदा दहीहंडीचा उत्साह सगळीकडे दिसणार आहे. ठाणे म्हटले की पाचपाखाडी येथील जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित केलेली दहीहंडी सगळ्यांना नक्कीच आठवत असेल. संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही हंडी उभारली जाते. मात्र यंदा संघर्षकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात येणार नाही. यामुळे गोविंदा पथकांचा जास्तच हिरमोड झालेला पहायला मिळतोय.आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले, दहीहंडीवर जेव्हा निर्बंध घालण्यात आले होते त्यावेळी त्या निर्बंधांच्या विरोधात मी कोर्टात सरकारविरोधात लढाई केली. पण दहीहंडीवर जी बंधनं आली त्यानंतर आता दहिहंडी करण्यात रस नाही.
आव्हाड म्हणाले, १९९९ मध्ये मी पहिल्यांदा दहीहंडी आयोजनात उतरलो होतो तेव्हा सकाळी ९ वाजता बोलायला सुरुवात केली की रात्री ११ वाजता स्टेजवरुन खाली यायचो. आता ती एनर्जी, ताकद आणि आवाज राहीलेला नाही. तसं पाहिलं तर कधी ना कधी यातून निवृत्त घ्यायची होतीच. वाढतं वय, एनर्जी याचा विचार करुनच वॉकआऊट केलेला आहे असे आव्हाडांनी सांगितले.मी स्वतः चाळीत वाढलो त्यामुळे दहीहंडीचा आनंद पुरेपुर घेतलेला आहे. दहीहंडीत जात, धर्म यांची भींत नाही. सगळे एकत्र येतात एकमेकांना धरून राहतात. एकमेकांचा आधार घेवून एकजण वर चढोत आणि दहीहंडी फोडतो. या खेळाने मला आयुष्यात खूप काही शिकवलं. आपली दहीहंडी नाही याची खंत मनाला आहे. संघर्ष दहीहंडीचा दणका जगभरात पोहोचल होता. अनेक सेलिब्रेटींची, मान्यवरांची उपस्थिती संघर्षच्या दहीहंडीत दरवर्षी पहायला मिळते. पण यंदा मात्र संघर्षची दहीहंडी होणार नाही त्यामुळे गोविंदापथकांचे हिरमोड झालेले आहे.