‘या’ कारणामुळे पुन्हा एकदा होतेय फडणवीस- पवार मैत्रीची चर्चा !

एकदा सत्ता गेली की अधिकारसुद्धा जातात आणि सरकारने रहायला दिलेले घर सुद्धा खाली करावे लागते. पण एखादा नेता जो आधी सत्तेत होता पण आता विरोधात आहे आणि त्याला त्याच घरात राहायचं असेल तर…..आपण बोलतो आहोत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल. अडीच वर्षे उपमुख्यमंत्री पदावर असताना त्यांना देवगिरी बंगला मिळाला होता. मात्र शिंदे गटाने बंंड केला, महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे सरकार सत्तेवर आलं. त्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते बनले. पण देवगिरी बंगला आपल्याकडे रहावा असे अजित पवारांना वाटत होते. म्हणून अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विनंती केली.यानंतर देवगिरी बंगला अजित पवारांन देण्यात येईल असे परिपत्रक सरकारकडून जारी करण्यात आले. 

अजित पवार आणि देवगिरी बंगल्याचे अतुट नाते आहे. तब्बल १६ वर्षे ते या बंगल्यात राहत आहेत. १९९९ मध्ये जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना अजित पवारांना देवगिरी बंगला मिळाला होता. १९९ ते २०१४ अशा सलग कालावधीत अजित पवार देवगिरी बंगल्यात राहीले आहेत. २०१४ मध्ये जेव्हा भाजपचे सरकार आले तेव्हा हा बंगला सुधीर मुनगंटीवार यांना मिळाला होता. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आले तेव्हा पवारांना पुन्हा हा बंगला मिळाला. अतिशय भव्य दिव्य असा देवगिरी बंगला असून मुख्यमंत्री निवासस्थानापेक्षा मोठा असल्याचे मानले जाते. 

देवेंद्र फडणवीस २०१९ साली जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांना सागर बंगला देण्यात आला होता. तो बंगला मंत्र्यांसाठी आरक्षित होता पण फडणवीस यांनी सागर बंगल्याची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकारनेही कोणताही आक्षेप न घेता फडणवीसांना सागर बंगला दिला होता. आता याची परतफेड म्हणून अजित पवारांची मागणी मान्य झालीय अशी चर्चा होतेय. 

अजित पवार यांच्याकडे देवगिरी बंगला कायम राहिल्यामुळे फडणवीस आणि पवार यांच्या घनिष्ट मैत्री पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेली आहे.दरम्यान अजित पवारांनी सामान्य प्रशासन विभागाला देवगिरी बंगला आपल्याकडे रहावा असे पत्र दिले होते असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येते आहे. सामान्य प्रशासन विभाग हा मंत्र्यांना बंगले वाटप करण्याचे काम करत असतो. दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस सागर बंगल्यात राहून राज्याची कमान सांभाळणार आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.