मंत्री संजय राठोड यांना धक्का ! तीन महंतासह हजारो बंजारा बांधव शिवबंधन बांधणार !

शिंदे गटातील मंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धक्का देण्याच्या तयारीत आहेत. पोहरा देवीच्या तीन महंतासह हजारो बंजारा बांधव शिवबंधन बांधणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे. बंजारा समाज नेहमीच संजय राठोड यांच्या बरोबर उभा राहीलेला आहे पण आता मात्र राठोडांची साथ सोडून मोठ्या संख्येने बंजारा समाज शिवसेनेत दाखल होणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी समजली जाणाऱ्या पोहरादेवी गडाचे तीन महंत आणि 50 ते 60 टक्के बंजारा समाज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी दिलीय एका वृत्तवाहिनीसोबत ते बोलत होते.
पोहरादेवी हे बंजारा समाजाचे सर्वात मोठे शक्तीपीठ आहे. या गडाच्या महंतांचा आदेश बंजारा बांधव शिरसावंद्य मानतात. वेळोवेळी संजय राठोडांची पाठराखण या महंतांनी केलेली आहे त्यापैकी तीन महंत शिवबंधन बांधणार आहेत आणि त्यांच्या सोबत समाजातील अनेक नेते आणि पन्नास ते साठ टक्के बंजारा बांधवही भगवा हाती घेणार आहे असा दुजोरा सुनील महाराज यांनी दिलाय. बंजारा समाजाने शिवसेनेत प्रवेश केल्यास संजय राठोड यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे संजय राठोड यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.