वाढत्या थंडीपासून वाचण्याचा रामबाण उपाय !

महाराष्ट्रात थंडीचा चांगलाचा जोर दिसून येतोय. स्वेटर, ब्लॅन्केट, कानटोपीचा जास्तीत जास्त वापर होतोय. थंडी वाढली की घराघरात काढे, हळद घातलेले दूध प्यायला सुरुवात होते. शारीरिक उष्णता वाढवण्यासाठी खास खाद्यपदार्थांचे सेवन करायला हवे. तीळाचा जास्त वापर थंडीत होतो. तिळकुट किंवा भाकरीला तिळ लावून किंवा तिळाचे लाडू, चिक्की आपण खात असतो. तिळाची चटणी खूप चविष्ठ असते त्यामुळेही थंडी कमी होते. अगदी पटकन होणारी तिळाची चटणी कशी करावी ते जाणून घ्या.
साहित्य: 1 वाटी पांढरे तीळ, 1/2 वाटी शेंगदाणे, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, 10-12 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट
कृती: तीळ कढई किंवा पॅन मध्ये भाजून घ्या. तीळ भाजताना काळजी घ्या कारण ते तडतडतात आणि उडतात म्हणून. तीळ भाजतांना थोडा पाण्याचा हबका मारावा म्हणजे तीळ छान खमंग भाजले जातील. तीळ छान भाजले की एका ताटात काढून घ्या. आता त्याच कढईमध्ये शेंगदाणे, जिरं आणि बडीशेप सुद्धा भाजून घ्या.भाजेलेलं साहित्य एका ताटात घेऊन थंड करून घ्या. साहित्य थंड झालं कि मिक्सर च्या भांड्यात भाजेलेले तीळ, शेंगदाणे, जिरं, बडीशेप आणि लसूण घाला. चवीनुसार मीठ घाला. लाल तिखट घाला. आणि मिक्सरला सर्व साहित्य भरड सारखं वाटून घ्या. तिळाची चटणी तयार आहे. तुम्ही पोळी, भाकरी अगदी भाताबरोबर त्याचा आस्वाद घेवू शकता. तिळाची चटणी जेवणात घेतना त्यात तिळाचं तेल घाला त्यामुळे ती अधिकच पौष्टीक आणि चवीष्ठ लागते.