शिंदे आणि ठाकरेंची सुप्रीम कोर्टात आज अग्निपरीक्षा !

महाराष्ट्रातील जनता, शिंदे गट आणि ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुप्रीम कोर्टात आज अग्निपरीक्षाच होणार आहे. महाराष्ट्रात झालेला बंड आणि त्यानंतर झालेला सत्ता संघर्ष यावर आज सुप्रीम कोर्टात फैसला होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात एकूण ४ याचीका दाखल करण्यात आल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची याचिका आहे ती म्हणजे १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीवर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सुप्रीम कोर्ट आज काय निकाल देणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.
अभ्यासकांच्या मते समजा सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला तर मंत्रिमंडळ विस्तार येत्या काही दिवसात होईल. मात्र सुप्रीम कोर्टाने आमदारांना अपात्र ठरवलं तर शिंदे सरकार कोसळू शकते. आता कौल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.
एकूण 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान, राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान, शिंदे गटाच्या प्रतोदाला शिवसेनेचा प्रतोद म्हणून मान्यता देण्यास आक्षेप, एकनाथ शिंदे यांचा शपथविधीला आणि विशेष अधिवेशनाला आक्षेप अशा चार याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हेमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे.