शिवसेना विरुद्ध शिंदे गट संघर्ष चिघळणार?

पुण्यामधील कात्रज चौकात शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे.युवा सेनानेते आदित्य ठाकरे यांची कात्रज येथे सभा झाल्यानंतर कार्यकर्ते जात असताना सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकजण जखमी झाला असून उदय सामंत यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी रात्रभर छापेमारी करत पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाचजणांना अटक केली आहे. या अटेकमुळे पुण्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून रात्रभर पोलिसांचे धाडसत्र सुरु होते
सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ‘असा भ्याड हल्ला करून, दगड मारून पळून जाणं म्हणजे काही मर्दुमकी नाही’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रत्येकाने कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न जर कोणी केला पोलीस कारवाई करतील’ असे ही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. जे कोणी चिथावणीखोर भाषा करतील, त्याची तपासणी पोलीस करतील आणि अशावर निश्चित कारवाई होईल.असं ही शिंदे यांनी स्पष्ट केलंय.
कात्रज येथे घडलेल्या घटनेमुळे पुणे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून येणार्या काळात शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे.