”शांत आहोत तर शांत राहू द्या, पिसाळायला लावू नका”, उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंना ‘वॉर्निंग’

शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर आणि बंडखोरांवर जोरदार घणाघात केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शिवसैनिकांना त्रास देऊ नये. जोपर्यंत शिवसैनिक शांत आहेत तोपर्यंत राहू द्या, पिसाळायला लावू नका, असा सज्जड दम देखील शीवतीर्थावरुन उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आणि भाजपाला दिला आहे.
शिवसेनेचा वाघ म्हणजे आनंद दिघे हे कायम पक्षाशी एकनिष्ठच होते. जातानासुद्धा ते भगव्यातून गेले. त्यांनी भगवा कधीही सोडला नाही. राज्य सरकारमधील काही लोक आता जाणूनबुजून आमच्या शिवसैनिकांना त्रास देत आहेत. पण मी आधीच सांगून ठेवतो आहे, जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका. माझ्या शिवसैनिकांवर अन्याय कराल, तर अजिबात खपवून घेणार नाही. तुमचा कायदा तुम्ही मांडीवर कुरवाळत बसा. एकतर्फी कायद्याचा वापर आम्ही होऊ देणार नाही अशी वॉर्निंग सुद्धा उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिली.
उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितले सभेनंतर परंपरेनुसार रावण दहन करणार आहोत. यावेळेचा रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आत्तापर्यंत दहा तोंडाचा होता. आता ५० खोक्यांचा खोकासूर आहे. आजच्या भाषणात वारंवार ते खोकासूर असे बोलत होते. हॉस्पिटलमध्ये असताना ज्यांच्यावर जबाबदारी दिली तेच कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच कसा शकणार नाही असा साऱ्यांचा प्रयत्न होता, पण त्यांना कल्पना नव्हती की हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. माझ्या शक्तीशी पंगा घेतला आहात, देव तुमचे भले करो. ही धमकी नाही, शाप आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली.