उद्धव ठाकरेंचे डावपेच, केवळ अंधेरीत नव्हे तर ‘मशाल’ मुंबईतील घराघरांत पोहोचणार

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि नवीन नाव मिळालेलं आहे. त्या नव्या नावासह आणि चिन्हासह अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उतरणार आहे.निवडणुकिसाठी वेळ कमी आणि घराघरात मशाल चिन्ह पोहोचवणे हे मोठे आव्हान ठाकरेंसमोर आहे. त्यातचं शिंदे गटाकडून पोटनिवडणुकीमध्ये प्रत्येक गोष्टीचं राजकारण होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. त्यामुळे भाजप-शिंदे गटासोबत दोन हात करताना उद्धव ठाकरे यांचा चांगलाच कस लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर तसेच मुंबई मनप निवडणुकीतील प्रचारात आघाडी घेण्यासाठी आत्तापासूनच मशाल हे निवडणूक चिन्ह घराघरात पोहोचिवण्याची रणनीती उद्धव ठाकरे यांनी आखलेली आहे. त्याप्रमाणे पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना विशेष सुचना देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. अंधेरीत मशालचा प्रचार होणारच आहे पण त्याचबरोबर शिवसैनिकांनी आपापल्या विभागामध्ये आत्तापासूनच मशाल चिन्हाचा प्रसार करावा अशा सूचनाच मातोश्रीवरुन देण्यात आलेल्या आहेत.

दिवाळीच्या निमित्ताने पक्षाची जाहिरात करणे हा त्यातील एक भाग आहे. प्रत्येक चौकात, गल्लीमध्ये तसेच प्रमुख रस्त्यांवर मोठ मोठे आकाशकंदील लावत त्यावर शिवसेना आणि धन्युष्यबाण असे चिन्ह असायचे. मात्र आता तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मशाल हे चिन्ह असेल, तसे कंदील करण्याचे कामसुद्धा सुरू झालेले आहे. घरोघरी जाणाऱ्या सुगंधी उटण्यांच्या पाकिटावरही मशाल हे चिन्ह छापण्यात आले असून ही पाकिटे या शनिवार, रविवारपासूनच घरोघरी वाटायला सुरुवात होणार असेल्याचे शिवसेनेच्या माजी मंत्र्याने सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.