शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खोडा?

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेत उभी फूट पडली. आता शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत एक आहे ठाकरे गट तर दुसरा शिंदे गट. दोन्ही गट एकमेकांवर सतत कुरघोडी करताना दिसत आहेत.नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सावात वरळी येथील जांबोरी मैदान पटकावून भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केली हे आपल्याला माहितच आहे. आता त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार आहे आणि त्याचे कारण आहे दसरा मेळावा.
शिवसेना,शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही समीकरणं वर्षानूवर्षे जुळलेली आहेत. मात्र यंदा ही परंपरा खंडित होणार असल्याचे दिसते आहे. कारण शिंदे गटाला सुद्धा शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा करुन आपणच खरी शिवसेना हे दाखवून द्यायचे आहे. याच दसरा मेळाव्यातून शिंदे गटाला महापालिके निवडणुकिचे रणशिंग फुकांयचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही दसरा मेळाव्यातून आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून द्यायची आहे. त्यामुळे आता दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान नक्की कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागेल आहे.
5 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून महापालिकेकडे अर्ज दाखल केलाय पण महापालिका हात आखडता घेतेय अशी चर्चा आहे. स्वत: उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासक इक्बाल सिंग चहल यांच्याशी संवाद साधलाय पण अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. शिंदे गटाला शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावे म्हणून जोरदार हालचाली होतायेत असे ही म्हटले जातेय. आता कोणाला शिवाजी पार्क येथील मैदान मिळते तसेच समजा शिंदे गटाला मैदान मिळाले तर दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मार्गदर्शन भाषण करणार का? याबाबत उत्सुकता लागली गेली आहे.