दसऱ्याआधी ठाकरेंचं मुंबईत, शिंदेंचं दिल्लीत ‘ट्रेलर’ प्रदर्शन !

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार याचं उत्तर अद्याप मिळालेलं नसलं तरी आज ठाकरेंची तोफ मुंबई मधील गोरेगाव येथील नेस्को मैदानात धडाडणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेचा हा पहिलाच मेळावा आहे.
या गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीचे शिवसेना रणशिंग फुंकणार आहे. दसरा मेळाव्याआधी होणाऱ्या मेळाव्याला विशेष महत्त्व आलेले आहे.संध्याकाळी ७ वाजता हा मेळावा होणार आहे.भाजप, विरोधक, शिवसेनेत झालेली बंडखोरी अशा अनेक विषयांवर ते बोलू शकतात. केंद्रीय यंत्रणांचा राज्यात होत असलेला वापर, मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारावरून मातोश्रीवर होत असलेल्या आरोपांवरून झालेलं राजकारण यावरही उद्धव ठाकरे बोलू शकतात
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत त्यांच्यासोबत काही आमदार, खासदार देखील असणार आहेत. ते दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आश्विनी वैष्णव यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आजच्या दिल्ली दौऱ्यामध्ये महाराष्ट्रात कोणता नवीन उद्योग आणता येऊ शकतो का? याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.