ईडी चौकशीत संजय राऊतांशी भेट झाली का? पत्रकारांच्या प्रश्नावर वर्षा राऊत म्हणाल्या…

एक हजार कोटीहून अधिक रकमेच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीदेखील ६ ऑगस्ट रोजी तब्बल ९ तासाहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर वर्षा राऊत यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले. ‘चौकशी दरम्यान संजय राऊत यांच्याशी भेट झाली का?’ असा प्रश्न विचारला असता राऊतांसोबत भेट झाली नाही असे उत्तर वर्षा राऊत यांनी दिले.
ईडी चौकशीनंतर पत्रकारांबरोबर बोलताना वर्षा राऊत यांनी स्पष्ट केले, ‘काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही. आम्ही सगळे कायम आणि सदैव उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत.’ तसेच ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावले का? यावर वर्षा राऊत म्हणाल्या, ‘मला पुन्हा ईडीने चौकशीसाठी बोलावलेले नाही पण जर पुन्हा चौकशीसाठी बोलावले तर नक्की चौकशीसाठी हजर राहीन’ असं उत्तर वर्षा राऊत यांनी दिले.
यावेळी संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी ही ‘आम्ही शिवसेनेसोबतच राहणार आहोत असे स्पष्ट केले.’ जबाबानंतर मी वहिनींशी बोललो त्यावेळी त्या एकच वाक्य म्हणाल्या, ‘काहीही झालं तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले.