काँग्रेसच्या पोस्टर्सवर राहुल गांधींसोबत पुन्हा झळकले सावरकर !

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येते आहे. आता भारत जोडो यात्रेत पुन्हा एकदा वीर सावरकर यांचे फोटो झळकले आहेत. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि वीर सावरकर यांना या पोस्टरमध्ये एकत्र दाखवण्यात आलंय. भारत जोडो यात्रेच्या पोस्टर्समध्ये छेडछाड करण्यात आल्याचं सांगितलं जात असून काँग्रेस गुन्हा दाखल करणार आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा कर्नाटकातून पुढे जात आहे. गुरुवारी यात्रेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या. त्याच दिवशी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत वीर सावरकर यांच्यासोबत राहुल गांधी असे पोस्टर झळकले होते. हे पोस्टर्स सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल झाले.
काँग्रेसनं या प्रकरणाची माहिती घेतली असून, आता या प्रकरणात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. खोडसाळ वृत्तीच्या लोकांकडून हे काम करण्यात आलंय. काँग्रेसकडून हे पोस्टर्स लावले गेले नाहीत. आम्ही याविरोधात मांड्या जिल्हा पोलिसांत तक्रार देऊ असे काँग्रेसचे नेते मोहम्मद नलपद यांनी स्पष्ट केलंय.