आई-वडिलांनीच ‘या’ कारणाने केली मारहाण, 6 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात अंधश्रद्धेचा कहर पहायला मिळाला. मुलीला झालेली भूतबाधा उतरविण्यासाठी आई-वडिलांनी तिला मारहाण केली. त्या मारहाणीत पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना आणि मावशी प्रिया बनसोड यांना अटक केली आहे.
नागपूरच्या सुभाषनगर भागात ही घटना घडली. आरोपी वडिलांना मुलीच्या हावभावात काही बदल जाणवत होता. त्यासाठी ते मुलीला घेवून भोंदूबाबाकडे गेले. भोंदूबाबाकडून सल्ला घेतल्यानंतर त्यांनी मुलीला जबर मारहाण केली. मुलीला मार सहन झाला नाही आणि ती निपचीप पडून होती. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिल युट्यूबवर स्थानिक वृत्तवाहिनी चालवतात. मुलीला झालेली भूतबाधा त्यांना उतरवायची होती. मुलीला केलेल्या मारहाणीची व्हिडीओ मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तो व्हिडीओ मिळवला आहे. आरोपी वडिलांनी मुलीला सरकारी हॉस्पिटमध्ये दाखल केल्यानंतर पळ काढला पण रुग्णालयाच्या गेटवर असणाऱ्या सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने आधीच गाडीचा फोटो काढला होता. ज्या गाडीतून आरोपी वडिल आले होते त्या फोटोवर गाडीचा नंबर स्पष्ट दिसत होता. त्यावरुनच पोलिसांनी तपासाची सुत्र हलवली आणि आरोपींना बेड्या ठोकल्या