या तामिळ अभिनेत्याला आवडला हर हर महादेवचा ट्रेलर..केला ट्विटर वर शेअर…

छत्रपती शिवाजी महाराजांवरील अजून एका सिनेमाचा ट्रेलर युट्युबवर आला आहे. ‘हर हर महादेव’ या सिनेमाच्या ट्रेलरला जोरदार प्रतिसाद लाभत आहे. ‘हर हर महादेव’ हा सिनेमा मराठीसह एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. बाकी भाषांमध्येही हा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या ट्रेलरवर व्ह्यूजचा पाऊस पडतो आहे, या व्ह्यूजची संख्या कमी वेळातचं लाखोंच्या घरात गेली आहे. युट्युबसह ट्विटरवर ही हा ट्रेलर लोकप्रिय ठरत आहे. ट्विटरच्या ट्रेंडिंग लिस्ट मध्ये तर हा पहिल्या स्थानावर आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर कला क्षेत्रातील मंडळींच्याही हा ट्रेलर पसंतीस उतरत आहे. यामध्ये आता एका तामिळ अभिनेत्याचीही वर्णी लागली आहे. तो आहे तामिळ सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती.
विजय सेतुपतीने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ‘हर हर महादेव’ सिनेमाचा तामिळ भाषेतील ट्रेलर शेअर केला आहे. ” मी हर्षपूर्वक ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत आहे. या चित्रपटाच्या टीमला मी खूप शुभेच्छा देतो, असा एक शुभेच्छा संदेशही त्याने लिहिला आहे. याला खूप लोकांनी रीट्विट व लाईक केलं आहे.
या सिनेमाची स्टारकास्ट तगडी आहे. बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत आहे शरद केळकर व शिवाजी महाराज म्हणून पडद्यावर दिसणार आहे सुबोध भावे. सोबत शरद पोंक्षे, मिलिंद शिंदे, किशोर कदम, अमृता खानविलकर, निशिगंधा वाड, सायली संजीव हे सर्व कलाकार आहेत. यावर्षीच्या दिवाळीत २५ ऑक्टोबर ला मराठी आणि हिंदी याबरोबरच कन्नड, तेलुगू व तामिळ या दाक्षिणात्य भाषांमध्येही ‘हर हर महादेव’ सिनेमा झळकणार आहे.