शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे भीषण अपघातात आज निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भातण बोगद्याजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकिला उपस्थित राहण्यासाठी मेटे मुंबईला येत होते. दरम्यान मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर पुढे जाणाऱ्या गाडीने मेटे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीची डावी बाजू चक्काचूर झालेली आहे.मेटेंना गंभीर दुखापत झाली होती. नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान मेटे यांची निधन झाले अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मेटे यांच्यासोबत त्यांचा सहकारी एकनाथ कदम हा सोबत होता. त्यानेच अपघातानंतर कोणतीही मदत मिळाली नाही असा आरोप केला आहे. कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर एक तासाने त्यांना मदत मिळाली. १०० नंबरला फोन केला पण फोन कोणी उचलला नाही. मदतीसाठी कदम यांनी अनेकांना विनवणी केली पण कोणीच मदत करायला तयार नव्हतं. अखेर एका गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि मदत केली. एक तासानंतर अॅम्ब्युलंस आली.या अपघात कदम किरकोळ जखमी झाले असून एक तास कोणीच मदत केली नाही असे त्यांनी सांगितले. आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर एमजीएम रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत. विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन राज्यात झालं त्यातील ते प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.शिवसेना-भाजप युतीच्या काळात आमदार आणि सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे ते रहिवासी आहेत.