विद्येच्या माहेरघरात सेक्सचं विद्यापीठ?

तुम्ही अनेक तंत्रांबद्दल ऐकलं असेल पण कधी सेक्स तंत्र याबद्दल ऐकलं आहे का सध्या विद्येच्या माहेरघरात म्हणजे पुण्यात या सेक्स तंत्राची जाहीरात सोशल मीडियावर व्हायरल होतेय. सत्यम शिवम् सुंदरम् या फाउंडेशनच्या वतीने सेक्स तंत्र नावाच्या कोसर्चं आयोजन ऐन नवरात्रीत केलंय. १ ते ३ ऑक्टोबर असा हा तीन दिवसांचा कोर्स असणार आहे. ज्यांना हे तंत्र शिकायचं आहे त्यांना १५ हजार रुपये फी द्यावी लागणार आहे. आयोजकांबरोबर संपर्क साधण्यासाठी एक क्युआर कोड देण्यात आलाय. पुण्यामधील ही जाहिरात जोरदार व्हायरल होत असून मनसे, हिंगू महासभा, तृप्ती देसाई आणि इतर संघटनांनी जोरदार विरोध केलाय.पुणे पोलिसांना याबाबत निवेदन देण्यात येणार असून पोलिसांनीसुद्धा यासंदर्भात तपास सुरु केला आहे. हे कायद्याच्या चौकटीत येतं का हे पाहिलं जाणार आहे.
सेक्स तंत्रचा कोर्स पुण्यातील कम्प भागात होणार असून या कोर्समधे पुढील कोर्स वैदिक सेक्स तंत्र, डिव्हाईन फेमिनाईन मस्क्युलाईन एंबॉडीमेंट, चक्र अॅक्टिव्हेशन, ओशो मेडिटेशन शिकविण्यात येणार आहे. या जाहिरातीवरुन सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘हा हिंदूंचा आणि त्यांच्या दैवतांचा अपमान आहे. हे हिंदू महासंघ कदापी सहन करणार नाही. ना आयोजकांचा पत्ता ना नावे, ना होणाऱ्या कार्यक्रमाचा पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती यामध्ये आहे. यावरूनच हे सर्व फसवं, घाणेरडं आणि एका नवीन विकृत संस्कृतीला जन्म देणारे ठरणार आहे. हिंदू महासंघ हे होऊ देणार नाही.’ अशी प्रतिक्रिया हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी दिलीय.
नवरात्रौ स्पेशल कॅम्प कोर्स या नावाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. असे असले तरी कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर संबंधित जाहिरात शेअर करून शंका उपस्थित केली आहे. जाहिरात बेकायदा असून त्याविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील असीम सरोदे यांनी केली आहे. आता या प्रकरणी पुण्यात पोलिस काय कारवाई करतात ती माहिती लवकरच समजेल.