शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कुणाला मिळणार? शरद पवारांची प्रतिक्रिया

धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याचा निकाल आता निवडणूक आयोग देणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पक्षावर आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर दावा सांगितलेला आहे. ठाकरे गटाकडून अंधेरीच्या पोटनिवडणुकीत त्याचा गैरवापर होऊ शकतो म्हणून धनुष्यबाण हा आम्हालाच मिळावा असे शिंदेगटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या अर्जात म्हटलं. यात राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे.
शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोग निकाल देईल. मला याबाबत काहीही सांगायचे नाही. निवडणूक आयोगाचा निकाल राजकीय पक्षाला मान्य करावाच लागतो अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर असून पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर पवार यांनी भाष्य केलंय. समाजामध्ये एका मोठ्या वर्गाला काही पिढ्या यातना सहन कराव्या लागल्या होत्या, त्या यातनेच्या संबंधित जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या घटकांना याची जाण व्हायला लागली आहे हा बदल योग्य आहे. नुसतं माफी मागून चालणार नाही आपण व्यवहारांमध्ये या सर्व घटकांची भूमिका या सर्व गोष्टी अवलंबून आहेत असे पवार म्हणालेत. सरसंघचालक भागवत यांनी वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था या सगळ्या भूतकाळ आहेत आपण त्या विसरून जायला हव्यात असं म्हटलं होतं.