World Meteorological Day : हवामान विभागाचे अंदाज का चुकतात ?

आज २३ मार्च, जागतिक हवामान दिन. हवामानाचा सामान्य माणसाशी थेट संबंध येतो. कधी ऊन तर कधी पाऊस. सततच्या बदलत्या हवामानाला सामान्य माणूस कंटाळलेला आहे. दोन महिन्यांत पावसाळा सुरू होईल. या काळात हवामान विभागाने वर्तवलेले अंदाज सर्वाधिक महत्त्वाचे ठरतात. मात्र बऱ्याचदा याबाबतचा सामान्य माणसाचा अनुभव फारसा चांगला नसतो.
मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली असताना नेमकं त्याच दिवशी कडकडीत ऊन पडावं आणि पाऊस गेला की काय असं वाटत असताना नेमक्या त्याच वेळी पावसाची रिमझिम व्हावी. हे असं का होतं ? हवामान विभागाने पहिल्या टप्प्यात वर्तवलेला देशभराचा अंदाज आणि प्रत्यक्ष स्थिती यांत ५ टक्क्यांचा कमी-अधिक फरक असतो. दुसऱ्या टप्प्यात मध्य, दक्षिण, वायव्य आणि ईशान्य अशा चार भागांत देशाचा अंदाज वर्तवला जातो. यात १५ ते २० टक्क्यांचा फरक असतो.
जेवढा भूभाग लहान तेवढा फरक अधिक. अंदाज आणि प्रत्यक्ष स्थितीमध्ये फरक असेल तर त्या अंदाजाचा फायदा होत नाही. भविष्यात जसजसे तंत्रज्ञान विकसित होत जाईल तसतसे हा फरक कमी होऊन राज्याचे अंदाज वर्तवता येतील.