कुत्रे आपल्या गाडीच्या मागे का लागतात?

तुम्ही गाडी किंवा दुचाकीने प्रवास करत आहात आणि अचानक तीन-चार कुत्रे तुमच्या मागे लागतात. तुमची घाबरगुंडी उडते. गाडीच्या मागे लागलेले कुत्रे भुंकून भुंकून अंगावर येतील आणि त्यांच्या कचाट्यात सापडलो तर ते चावतील की काय इतके ते आक्रमक दिसतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की कुत्रे नक्की कोणत्या कारणामुळे आपल्या गाडीच्या मागे धावतात?
कुत्र्यांना आलेला वाईट अनुभव
आपल्या डोळ्या देखत एखाद्या कुत्र्याला किंवा त्याच्याच नात्यातल्या कुत्र्याला गाडीने उडवलेलं, चिरडलेलं पाहीलं असेल तर कुत्र्यांच्या डोक्यात ती घटना फिट्ट बसते. गाड्यांविषयी त्यांच्या मनात राग निर्माण होतो आणि नेमकं त्या घटनेच्या वेळी कोणती गाडी होती हे ओळखता न आल्याने जेव्हा जेव्हा एखादी गाडी त्याच्या समोरून जाते तेव्हा तेव्हा ते त्या गाडीच्या मागे धावतात.
कुत्र्यांची सीमा ठरलेली असते
कुत्र्यांची ही जागा ठरलेली असते. ते त्याच्या इलाक्यात वावरत असताना तिथल्या झाडावर, गड्यांवर मूत्रविसर्जन करतात आणि इतर आसपासच्या कुत्र्यांच्या मूत्राचाही वास ओळखतात. पण दुसऱ्या जागेवरची गाडी आली की कुत्र्यांना दुसऱ्या कुत्र्यांच्या मुत्राचा वास येतो आणि त्याच वासाच्या दिशेने ते भुंकतात, गाडीचा पाठलाग करु लागतात.
रक्षण करणं त्याची जबाबदारी
कुत्रे जिथे राहतात तिथल्या लोकांना ते चांगलेच ओळखतात. आपल्या इथे कोणी अनोळखी व्यक्ती आली की ती व्यक्ती वाईट उद्देशाने आली आहे असं त्यांना वाटतं आणि ते भुंकतात. गाडी चालवतानाही आपला वास आणि आपला चेहरा त्यांना अनोळखी वाटतो. त्यात आपण हेल्मेट घातलं असेल तर त्यांना आपण चोर वाटतो. त्यामुळे ते आपल्या जागेतील लोकाचं संरक्षण करण्यासाठी गाडीच्या मागे धावू लागतात.
हा मोठा प्राणी कोणता
कोणता ही मोठ्या आकाराचा प्राणी पाहीला तर कुत्रे त्याच्यावर भुंकू लागतात. तसंच जेव्हा गाडी सुरू होते तेव्हा तिची लाईट हे एका प्राण्याचे डोळे आहेत असं कुत्र्यांना वाटतं आणि गाडी चालू झाल्यामुळे तिचा जो आवाज येतो तो एक प्राणी घुरघुरत असल्याप्रमाणे कुत्र्यांना वाटतं. एकूणचं ती गाडी एक सजीव प्राणी आहे असं कुत्र्यांना वाटतं आणि ते गाडीच्या मागे धावतात.
कुत्रे गाडीच्या मागे लागले तर तुम्ही काय कराल ?
- गाडीच्या मागे कुत्रे लागले असतील तर एखादी शर्यत लावल्या प्रमाणे त्यांना चिडवण्याचा, डिवचण्याचा, मागे पळण्यासाठी अधिक उद्युक्त करण्याचा अजिबात प्रयत्न करु नका याने ते अधिक आक्रमक होतात.
- कुत्रे मागे धावत असतील तर गाडीचा स्पीड कमी करा किंवा एका ठिकाणी गाडी थांबवल्याने ते शांत होतात आपल्याला कोणतीही इजा ते करत नाहीत.
- कुत्रे आपल्या मागे लागतील हे माहित असल्यामुळे गाडीच्या मागे बसणारे अनेक लोक कुत्र्यांना मारण्यासाठी छोटे दगड किंवा एखादी काठी ठेवतात आणि ते मागे लागले की त्यांना मारतात. असं अजिबात करु नये
- कुत्र्याकडे लक्ष देऊ नका आपण पुढे निघून गेलो आहोत म्हणजे आपण काही केलेले नाही असं त्यांच्या लक्षात येतं आणि ते आपोआपच आपला पाठलाग सोडून देतात, शांत होतात