पक्षचिन्हाच्या निर्णयासाठी शिंदे गट एवढा हट्टाला का पेटलाय?

शिंदे गट निवडणूक आयोगाच्या माध्यमातून धनुष्यबाण या चिन्हाचा निर्णय लावण्यासाठी इतका आटापिटा का करतंय असा सवाल उपस्थित होतोय. त्यासाठी दोन प्रमुख कारणे आहेत.
एक म्हणजे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेली अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. शिवसेनेने या मतदारसंघातून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना रिंगणात उतरवण्याचे ठरवले आहे. ऋतुजा लटके या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. याशिवाय, सहानुभूतीचा फॅक्टर ऋतुजा लटके यांच्या बाजूने असेल. अशावेळी शिंदे गटाला आपला उमेदवार निवडून आणणे जवळपास अशक्यप्राय ठरेल. त्यामुळे या निवडणुकीआधी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून धनुष्यबाण हे चिन्ह आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गट प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते.
राज्यातील प्रमुख महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपल्यात. भाजपने या सगळ्या निवडणुकांची फार पूर्वीपासूनच तयारी केलीय. याउलट शिंदे गटाचे भविष्यातील अस्तित्त्व पूर्णपणे न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी फोडले असले तरी शिंदे गटाला तांत्रिकदृष्ट्या आणि औपचारिकरित्या शिवसेना म्हणून मान्यता मिळालेली नाही. सत्तेत असल्याने राज्यातील संपूर्ण यंत्रणा शिंदे गटाच्या हाताशी असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह निर्णायक भूमिका वठवू शकते. कारण, मतदारांमध्ये अद्याप खरी शिवसेना कोणाची याबाबत संभ्रम आहे.