दसरा मेळाव्यावरुन का सुरु आहे रणकंदन ?

राजकीय वातावरणात सध्या चर्चा होतेय ती एका गोष्टीची ती म्हणजे दसर मेळावा कोण घेणार? शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर हक्क सांगण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट हे दोघेही प्रयत्नशील आहेत. तर मनसेकडून राज ठाकरे यांना देखील दसरा मेळाव्या घ्या अशी विनंती करण्यात येतेय. आपल्याला माहितच आहे शिवसेनेत फूट पडलेली आहे. शिवसेना कोणाची हा वाद तर सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा कुणाचा हे सिद्ध करण्यासाठी सध्या राज्यात शिवसेना आणि शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसतायेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर 30 ऑक्टोबर 1966 साली पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला होता. या दसरा मेळाव्याला किमान 55 वर्षांचा इतिहास असून शिवसेनेची आगामी भूमिका या मेळाव्यात ठरत असे. या मेळाव्यातून शिवसैनिकांना वैचारिक भूमिका आणि दिशा स्पष्ट कळत असे.त्यामुळे दसरा मेळावा, शिवसेना आणि शिवाजी पार्क यांचे एक अतूट नात आहे.
आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनी दसरा मेळाव्यावर दावा केलाय याची कारणे पुढीलप्रमाणे
दसरा मेळावा आणि शिवसेना म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू, त्यामुळे ज्याचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार त्याची शिवसेना असा संदेश जाणार. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यासाठी चुरशीचा सामना दिसून येतोय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 55 वर्षांपूर्वी दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली. येथूनच हिंदुत्वाचा विचार जनमानसात रुजवला. त्यामुळे या मेळाव्यातून शिंदे गटाला एक संधी वाटते आहे की आपणच शिवसेना हे सिद्ध होईल.
दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या भूमिका स्पष्ट होत असे मात्र आता शिवसेनेत दोन गट पडलेत. शिवसेनेच्या फुटीनंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांना गद्दार ठरवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. दसरा मेळाव्यातून अधिकृतरित्या दुसऱ्या बाजूला गद्दार ठरवण्याची संधी दोन्ही शिवसेनेपुढे आहे.
दसरा मेळावा या दोन्हींपैकी जो घेईल, त्याला पक्षावर आणि चिन्हावर दावा करण्याची संधी मिळणार आहे. आगामी महापालिका निवडणुका पाहता शक्तिप्रदर्शनाची संधी दोन्ही बाजूंना असेल. या सर्व कारणामुळे ठाकरे आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यासाठी चढाओढ लागली आहे.