संजय राऊत बंडखोरांच्या रडारवर का?

शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केलं. दहा दिवस सुरत आणि गुवाहाटीत मुक्काम ठोकल्यानंतर या बंडखोरांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचा उमेदवारही निवडून आणला. विश्वासदर्शक ठरावही जिंकला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वच बंडखोर आमदार आपआपल्या मतदारसंघात आले. कामांना सुरूवातही केली. पण या सर्व काळात बंडखोरांनी उद्धव ठाकरेंवर एका शब्दानेही टीका केली नाही. संजय राऊतांवर मात्र सर्वच आमदार टीका करत होते. संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटल्याचा आरोपही काही आमदार करत होते. राऊत अचानक बंडखोरांच्या रडारवर आले.

राऊतांची भाषा खटकली

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भाषेला बंडखोर आमदारांचा सर्वाधिक आक्षेप होता. राऊत हे अत्यंत खोचक शब्दात टीका करतात. मनाला लागेल असं ते बोलतात. ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात, असा आक्षेप बंडखोरांनी केला होता. राऊतांचा अॅटिट्यूड योग्य नव्हता. बंड केल्यानंतर सर्वांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी राऊत बाप काढत होते. टीका करत होते. त्यामुळे आम्ही दुखावले गेलो होतो, असं या आमदारांचं म्हणणं आहे.

राष्ट्रवादीशी सलगी आवडली नाही
राऊतांचे राष्ट्रवादीशी चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी त्यांचे अधिक चांगले संबंध आहेत. राऊत राष्ट्रवादीच्या नादी लागून शिवसेना संपवत असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पवार जसं सांगतात तसंच ते ऐकतात, असाही काही आमदारांचा आरोप आहे. त्यामुळेही राऊत या आमदारांच्या रडारवर आले आहेत.

आघाडी आवडली नाही
शिवसेनेची भाजपबरोबर युती होती. ही नैसर्गिक युती आहे. त्यामुळे भाजपसोबत राहिलं पाहिजे, असं या आमदारांचं मत आहे. पण राऊत यांनी पुढाकार घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची आघाडी घडवून आणली. ही आघाडी बंडखोर आमदारांना आवडली नव्हती. त्याबद्दल या आमदारांनी उद्धव ठाकरेंकडे नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, राऊत यांच्यापुढे पक्षनेतृत्व जात नव्हते. त्यामुळेही बंड करताच या बंडखोरांनी राऊतांवर हल्लाबोल केला.

पक्षात अवास्तव महत्त्व
बंडखोर आमदारांना सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे राऊत यांच्यासह काही लोकांना पक्षात अवास्तव दिलेलं महत्त्व. जे नेते लोकांमधून निवडून आलेले नाहीत. ज्यांनी कधी आंदोलन मोर्चा काढला नाही. जे कधी लोकांच्या समस्यांना धावून गेले नाही, अशांना शिवसेनेत महत्त्व आहे. त्यात राऊत सुद्धा असल्यानेही राऊत बंडखोरांच्या रडारवर आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.