मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिलं उत्तर, म्हणाले…

शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर शिंदे गटामध्ये इनकमिंग सुरुच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतले ४० आमदार आणि १२ खासदार आहेत. अनेकजण शिंदे गटात येणार अशी चर्चा सुरु असताना एका नाव वारंवार चर्चेमध्ये येत आहे. ते म्हणजे उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचे. आज याची जास्त चर्चा झाली कारण काल धुळ्यात गुलाबराव पाटील यांनी केलेलं वक्तव्य. आता शिंदे गटातील मंत्रीच असे म्हणत असेल तर चर्चा होणारच. यानर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
मुख्यमंत्री शिंदे एका कार्यक्रमात आलेले असताना पत्रकारांनी मिलिंद नार्वेकर यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. तेव्हा शिंदे म्हणाले, मला याबद्दल काही माहित नाही. मी काहीही लपवून ठेवत नाही मी जे काही करतो ते सगळं पारदर्शक आहे. पोटामध्ये एक आणि ओठात एक असे माझे काही नसते, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया देणे टाळले आहे. गणेशोत्सव काळात मुख्यंत्री शिंदे मिलींद नार्वेकर यांच्या घरी गेले होते. तेव्हा सुद्धा अशी चर्चा रंगली होती. पण जर मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात गेले तर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे यात शंकाच नाही. आता दसरा मेळाव्यात शिंदे गटात अनेकजणांचे प्रवेश होणार आहेत त्यात नार्वेकर शिंदे गटात जाणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.