आदित्य ठाकरेंनी सांगितलं तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री कधी?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडलेली आहे. दुभंगलेल्या शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी युवानेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अथक प्रयत्न करताना दिसत आहेत. शिवसेनेच्या पडत्या काळात तेजस ठाकरे राजकारण प्रवेश करणार या चर्चा पुन्हा होवू लागलेल्या आहेत.
आगामी दसरा मेळावा ठाकरे आणि शिंदे गटासाठी महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने एक पोस्टर व्हायरल झालं असून तेजस ठाकरे राजकारणात येणार अशी चर्चा सुरु झालेली आहे.याबाबत आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांनी स्पष्टच उत्तर दिले आहे. तेजस ठाकरे राजकारणात येणार का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाचे उत्तर दिले आहे. प्रथम तरी हा प्रश्न ऐकल्यानंतर ते थोडेसे हसले आणि नंतर म्हणाले, तेजस ठाकरेंविषयीच्या बातम्या कोण पेरतं माहित नाही. मात्र त्यामध्ये काही तथ्य नाही. तेजस ठाकरे हे त्यांच्या वाईल्डलाईफमध्ये बिझी आहेत आणि आम्ही आमच्या. त्यामुळे अशा फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नका असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.