भालाफेकपटू नीरज चोप्राने रचला इतिहास!

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा इतिहास रचलेला आहे.जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने रौप्यपदक पटकावलं आहे. खरंतर नीरजकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती मात्र कडवी झुंज देत त्याने रौप्य पदक पटकावलं आहे.
नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला होता. तर दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 82.39 मीटर भाला फेकला. तर नीरजने चौथ्या प्रयत्नानंतर 88.13 मीटर्सवर भाला फेकला. हाच त्याचा सर्वोत्कृष्ट थ्रो ठरला आणि रौप्य पदक त्याने मिळवलं. यात ग्रेनेडाचा अँडरसन वन पीटर्सनं सुवर्णपदक जिंकलं असून त्याने पहिल्या प्रयत्नात 90.21 मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर भाला फेकला होता.
नीरज चोप्राने रौप्य पदक जरी मिळवलं असलं तरी 19 वर्षांत जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला एकही पदक मिळालं नव्हतं. त्यामुळे नीरजच्या रौप्य पदाकाने भारतीय अॅथलिट्सच्या वाट्याला आलेला पदकांचा दुष्काळ दूर झालेला आहे. 2003 मध्ये जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीचं कांस्यपदक मिळवलं होतं त्यानंतर आता नीरज चोप्राने रौप्य पदक मिळवलेलं आहे.