मनोहर पर्रीकर व गोपीनाथ मुंडे, भाजपाच्या मातब्बर नेत्यांपैकी एक होते. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे महाराष्ट्रात भाजपा वाढली तर गोव्यामध्ये तेच काम मनोहर पर्रीकर यांनी केले होते. सुरवातीच्या काळात गोव्यात भाजपा वाढवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांचा फार मोठा वाटा होता. मनोहर पर्रीकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय देखील गोपीनाथ मुंडेंनीच घेतला होता, म्हणूनच गोव्यामध्ये भाजपा वाढवण्याचे काम गोपीनाथ मुंडे व मनोहर पर्रीकर यांनी कसे केले? तेच जाणून घेऊयात
1980 मध्ये स्थापन झालेली भारतीय जनता पार्टी हळूहळू भारतभर आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये होती. महाराष्ट्रात आपला प्रभाव वाढण्यासाठी भाजपने शिवसेनेसोबत युती करण्याचं ठरवलं. त्यानुसार 1989 साली भाजपा व शिवसेनेची युती झाली. आणि या युतीचा भाजपाला मोठा फायदा झाला. शिवसेनेसोबत युती केल्यानंतर महाराष्ट्रात भाजपला एक नवीन स्टार्ट मिळाला होता, आणि याचाच फायदा घेत भाजपने संपूर्ण महाराष्ट्रभर आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली. ज्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांसारख्या भाजपच्या नेत्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महाराष्ट्रात आपलं प्रस्थ वाढवल्यानंतर आता भाजपला गोव्यामध्ये देखील सुरुवात करायची होती. ज्याची जबाबदारी महाराष्ट्रात भाजप वाढवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्यावर टाकण्यात आली होती.
या दरम्यानच्या 1990 च्या दशकात मनोहर पर्रीकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत होते. संजय वालावरकर या त्यांच्या मित्रामुळे मनोहर पर्रीकर संघाच्या शाखेवर गेले आणि इथून त्यांच्यावर संघाचे संस्कार होण्यास सुरुवात झाली. अयोध्येत राम मंदिर व्हायला हवे म्हणून, 90 च्या दशकात गोव्यातून अयोध्येला कारसेवेमध्ये जे स्वयंसेवक गेले होते, त्यातही मनोहर पर्रीकर यांचा समावेश होता आणि पुढे पर्रीकर हे संघाच्या आग्रहास्त राजकारणात येऊन पोहोचले.
गोव्यामध्ये भाजपा सत्तेत येण्या अगोदर काँग्रेस सत्तेत होती. व मगोप प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बचावत होता. मगोप म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष. प्रामुख्याने हिंदू मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मगोपचे हिंदू बहुजन समाजाचे हक्काचे मतदार होते ज्यांना ख्रिश्चन मतदारांची देखील काही प्रमाणात साथ मिळायची. गोवा मुक्त झाल्यानंतर सुरवातीच्या काळात गोव्यावर मगोपचीच सत्ता होती. नंतर सत्तांतर करत काँग्रेसने गोव्याने सत्ता मिळवली. मगोप चा इतिहास पाहता, गोव्यामध्ये भाजपला मोठ होण्यासाठी मगोप सोबत युती करावी लागेल हे तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी ओळखले होते. आणि मनोहर पर्रीकर यांना सोबत घेऊन तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी प्रमोद महाजनांच्या साथीने भाजपा व मगोप च्या युतीसाठी प्रयत्न चालू केले.
मनोहर पर्रीकर हे आयआयटी मुंबई मध्ये शिकलेले उच्चशिक्षित व्यक्ती होते, राम जन्मभूमी आंदोलनावेळी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यासोबतच त्यांच्यावर राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे संस्कार देखील झाले होते. त्यामुळे गोव्याचे नेतृत्व करण्यासाठी गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांनी मनोहर पर्रीकर यांचं नाव समोर आणलं आणि मुंडे व महाजनांनी पर्रीकरांवर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी देखील दिली.
अखेर 1994 ला गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन व मनोहर पर्रीकर यांचे प्रयत्न फळास आले व गोव्यामध्ये मगोप व भाजपची युती अस्तित्वात आली. पण 1994 साली या युतीला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे ही युती विरोधी बाकांवर बसली होती. मात्र हळू हळू गोव्याच्या राजकारणात जम बसवत या युतीने विजय मिळवला. परिणामी, मनोहर पर्रीकर २४ ऑक्टोबर २००० ला गोव्याचे मुख्यमंत्री झाले. १९९४ ते २०१२ या काळात भाजप व मगोपच्या युती मध्ये अनेकदा बिघाडी झाली मात्र २०१२ ते आजतागायत गोव्यात भाजपा व मगोप ची युती अस्तित्वात आहे. सोबतच २०१२ पासून गोव्यात सातत्याने भाजप व मगोप युतीचे सरकार विजयी होत आहे.
गोपीनाथ मुंडे हे गोव्यातील भाजपा व मगोपच्या युतीचे जनक आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे अस्तित्वात आलेल्या या युतीमुळे गोव्यामध्ये भाजपला उभारी मिळाली. अशी प्रतिक्रिया खुद्द मनोहर पर्रीकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या बद्दल बोलताना दिली होती. सुरवातीच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गोव्यात सुरवात केली, तर मनोहर पर्रीकर यांनी संपूर्ण गोव्यात भाजपाला वाढवण्याचे काम केले. गेल्या १२ वर्षांपासून गोव्यात भाजपाला यश मिळतंय, आणि या यशाचा पाया गोपीनाथ मुंडे यांनी ठेवला होता, ज्याला वाढवण्याचं काम मनोहर पर्रीकरांनी केलं. गोपीनाथ मुंडे व मनोहर पर्रीकर याच्या युतीने गोव्यात केलेल्या या जादूचे किस्से आजही अनेकांच्या आठवणीत आहेत. तर यावर तुमचे मत काय? ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.
महाराष्ट्र कट्ट्याच्या संपूर्ण टीम कडून राष्ट्रप्रेम व कर्तव्यनिष्ठा यांचे प्रतीक, भारताचे माजी संरक्षण मंत्री व गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री.मनोहर पर्रीकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!