राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेचा उद्देश आर्थिक साहाय्य पुरवणे हा आहे. मात्र, काही लाभार्थ्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याची बाब उघडकीस आली आहे. या मुद्द्यावर महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपले स्पष्ट मत मांडले. त्यांनी सांगितले की, अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करून त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल.
आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
तटकरे यांनी स्पष्ट केले की, “चुकीची माहिती देऊन लाभ मिळवणाऱ्या महिलांकडून रक्कम राज्य सरकारच्या तिजोरीत जमा केली जाईल. या रकमांचा उपयोग विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी होईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, सरकारने अर्ज पडताळणीसाठी एक “क्रॉस व्हेरिफिकेशन सिस्टीम” विकसित केली आहे. यामुळे, खोटी माहिती देणाऱ्या महिलांची ओळख पटवली जाईल आणि त्यांचे अर्ज रद्द केले जातील.
पडताळणी प्रणाली समोर
महिलांच्या अर्जांची तपासणी ही संबंधित सरकारी विभागांच्या सहकार्याने केली जात आहे. यात, ज्या महिलांनी त्यांच्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा अधिक लाभ घेतला आहे, त्या समोर येतील. तसेच, ज्या महिलांनी राज्याबाहेर स्थलांतर केले आहे, लग्न करून इतर ठिकाणी गेलेल्या आहेत किंवा गेल्या काही महिन्यांत सरकारी नोकरी मिळवली आहे, त्यांचीही पडताळणी केली जाईल.
लाडक्या बहिणींना केले आवाहन
आदिती तटकरे यांनी महिलांना आवाहन करत म्हटले, “ज्या महिलांनी चुकीची माहिती दिली आहे, त्यांनी स्वखुशीने पुढे येऊन आपले अर्ज मागे घ्यावेत. यामुळे पुढील कारवाई टाळता येईल.”