पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला आणि आपल्या जीवनातील अनुभव व आव्हानांवर मोकळेपणाने चर्चा केली. पॉडकास्टमधील एक विशेष क्षण होता, जेव्हा मुलांनी मोदींना विचारले की, “रात्रंदिवस तुम्हाला शिव्या मिळाल्यावर कसे वाटते?”
यावर पंतप्रधान मोदींनी एक अहमदाबादी जोक सांगितला, जो जीवनातील सकारात्मकतेचा दृष्टिकोन स्पष्ट करतो. त्यांनी किस्सा सांगताना म्हटले, “एक अहमदाबादी स्कूटरवरून जात असताना अपघात झाला. समोरच्या व्यक्तीने रागाने शिव्या दिल्या, पण अहमदाबादी व्यक्ती शांत राहिली. लोकांनी विचारल्यावर तो म्हणाला, ‘तो फक्त शिव्या देतोय, काही घेऊन जात नाही ना.’”
मोदी म्हणाले की, “लोकांची निवड त्यांची आहे, पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की व्यक्तीने सत्याच्या पायावर उभे राहावे आणि त्याच्या मनात कोणतेही पाप नसावे.”
सार्वजनिक जीवनातील संवेदनशीलता:
पंतप्रधानांनी सांगितले की सार्वजनिक जीवनात वादविवाद हे अपरिहार्य आहेत. मात्र, व्यक्तीने गेंड्याच्या कातडीसारखा कठोर न होता संवेदनशील राहणे अधिक महत्त्वाचे आहे. संवेदनशीलता नसल्यास लोकांचे कल्याण करणे कठीण होईल.
ते म्हणाले, “गुजरातचा मुख्यमंत्री बनल्यावर मी तीन गोष्टी ठरवल्या – मेहनत कमी करणार नाही, स्वतःसाठी काही करणार नाही आणि चुकीचे काहीही करणार नाही. मी देवता नाही, पण रंग बदलणारा व्यक्ती देखील नाही. जर तुमचं वागणं योग्य असेल, तर तुमच्यासोबतही योग्यच होईल.”
पॉडकास्टमधील या प्रेरणादायी संवादामुळे पंतप्रधान मोदींनी जीवनातील तत्त्व आणि सकारात्मकतेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.