अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीकडून चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री अडीच वाजता वांद्रे येथील त्यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने एका व्यक्तीने प्रवेश केला. घरातील मोलकरणीने त्या चोराला पाहून आरडाओरड केली. आवाज ऐकताच झोपेतून जागा झालेला सैफ बाहेर आला, तेव्हा चोराने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या असून सध्या त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर सैफची पत्नी करीना कपूरने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. करीनाच्या टीमने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सैफ सध्या रुग्णालयात उपचार घेत असून तैमुर आणि जेह दोघंही पूर्णपणे सुरक्षित आहेत. या घटनेमुळे कपूर-खान कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, मात्र परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली आहे.
कपूर कुटुंबीयांनी त्यांच्या चाहत्यांना आणि मित्रपरिवाराला पाठिंब्यासाठी धन्यवाद दिले असून सैफ लवकरच बरा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
करीनाच्या टीमकडून स्पष्टीकरण:
‘काल रात्री अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. या घटनेदरम्यान सैफच्या हाताला दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरातील इतर सर्व सदस्य सुरक्षित आहेत. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना संयम बाळगण्याची विनंती करतो.
या घटनेचा तपास पोलीस करत असून कोणतेही अनुमान लावू नयेत, अशी आमची विनंती आहे. तुम्ही आम्हाला व्यक्त केलेल्या काळजी आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो,’ असा संदेश करीनाच्या टीमकडून देण्यात आला आहे.
चोराने अभिनेता सैफ अली खानवर सहा वेळा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात सैफच्या मणक्याजवळही वार झाला आहे. सध्या सैफवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
हल्ल्याच्या वेळी अभिनेत्री करीना कपूर घरी होती का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, त्याआधीच्या रात्री करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर डिनर पार्टीचे फोटो शेअर केले होते. त्या फोटोमध्ये ती तिची बहीण करिश्मा कपूर आणि मैत्रिणी सोनम व रिया कपूरसोबत पार्टी करताना दिसत होती.
सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती रात्रभर त्याच्या घरात लपून बसल्याचे समोर आले आहे. रात्री दोनच्या सुमारास घरातील महिला कर्मचाऱ्यांशी काहीसा वाद होत असल्याचा आवाज सैफने ऐकला.
आवाज ऐकताच तो बाहेर आला, त्याचवेळी हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोराचा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी काही संबंध होता का? तो घरात कसा शिरला? आणि त्याचा उद्देश चोरी करणे होता का? या सगळ्याचा पोलीस कसून तपास करत आहेत.